पार्ट्या

आज मी घरी पनीर टिक्का बनवला. तो 'मी' बनवला असल्याने जरा जास्त कौतुक ... माझं
मीच केलेलं. साहित्य, कृती, सजावट (garnishing), ह्या सगळ्याच्या मध्ये फोटो सेशन,
थोडी चव घेऊन बघितली, काही कमी जास्त घालायचं आहे का ही चर्चा केली (मी ..माझ्याशीच)
आणि एकदाचा तो पनीर टिक्का झाला... चांगला झाला ... मग मी त्याची चव घेतली आणि
आठवणीत मागे पडलेले दिवस अन् चेहरे असं बरंच काही सापडलं. अर्थात ते काहीच
विस्मरणात गेलेलं नव्हतं, पण घाई-गर्दीच्या दैनंदिनीत थोडं मागे पडलं होतं.
आमच्या जुन्या घरी असताना घरात आम्ही एकंदर ९ जण होतो. आजी आजोबा,
काका-काकू आणि चुलत भाऊ , आई-बाबा आणि मी आणि ताई. आमच्या बिल्डींगमध्ये मजल्यावर ४
ब्लॉक होते. आमच्या मजल्यावर एकूण चार घरं मिळून २१ माणसं - ९ मुलं-मुली आणि १२
मोठी. ब्लॉक सिस्टीम असली, तरी मोठ्यांची नुसती वयंच मोठी नव्हती तर मनंही मोठी आणि
मोकळी होती त्यामुळे दिवसभर चारही दारं उघडी असायची, चाव्या एकमेकांकडे असायच्या.
आम्ही मुलं आपापल्या घरी कमी आणि शेजारीच जास्त असायचो. ते दिवस जिव्हाळ्याने
नटलेले होते. टीव्ही वरचे सुपरहिट मुकाबला, छायागीत, चांगले चित्रपट एकत्रच बघितले
जायचे, थिएटर मध्ये एकत्र जाणं व्हायचं. पण ह्या सगळ्यात प्रकर्षाने आठवतात त्या
आमच्या 'पार्ट्या'.
दुपारी एकमेकांकडे निरोप , वाती , पुस्तक यांची देवाणघेवाण
करायचं निमित्त व्हायचं आणि कोणीतरी म्हणायचं "काकू खूप दिवसांत पार्टी नाही
झाली'... म्हणायचा अवकाश, कोणतीही काकू असो, लगेच "चल मग आज करूया की .." असं ती
म्हणायचीच. लगेच मेन्यु ठरायचा, तयारी सुरु व्हायची. चारही घरांतून सामानसुमानाची
जमवाजमव व्हायची आणि ऑफिस मधील मंडळी घरी परतायच्या आत पार्टीची सगळी तयारी
झालेली असायची. एकांकडे स्वयंपाक, दुस-यांकडची सतरंज्या आणि भांडी, तिस-यांकडे जेवणं
आणि आमच्याकडे गप्पांची बैठक हा जणू नियमच होता. मजेमजेत, आरडा-ओरडीत
स्वयंपाक पार पडायचा, मजल्यावरील काका लोकांची स्पेशल भज्यांची डिश् असायची. गप्पा
आणि हसण्या-खिदळण्यातच सगळी पार्टी पार पडायची.
कधी भारत बंद , कधी मुंबई बंद असेल, पावसामुळे गाड्या बंद असतील,तर हमखास सगळीच
जणं घरी असायचीच, मग तर पार्टी ठरलेलीच. बटाटेवडे व्हायचेच पण एकत्र असण्यामुळे ते
अधिक चटकदार लागायचे.
ह्या पार्ट्याना निमित्त नव्हती, ऑर्गनायाझर्स नव्हते. डेकोरेशन्स नव्हती. त्या
पार्ट्या अगदी सरळ 'पार्ट्या' च होत्या , ते इव्हेंट्स नव्हते, त्या ट्रीट्स
नव्हत्या. ते एक संमेलन असायचं. त्यात झगमग नव्हती, चकचकाट नव्हता; पण मजा होती,
एकत्रितपणाचा आनंद होता, प्रेम होतं. महागडे पिझ्झाज्, किवा ग्रेव्हीज् नसायच्या पण
एक नव्हे तर तीन काकूंच्या हाताची प्रेमाची चव होती. (खालच्या मजल्यावरील लोकांच्या
थोड्या हेव्याची चटकदार फोडणीही होती; कारण त्या मजल्यावरील चार घरं अशा पद्धतीने
कधी एकत्र यायची नाहीत.) मनं तृप्तच असायची, त्यात हिशेबी वखवख नव्हती.
कोणाकडच्यांचं काय अन् किती हे कधीच मोजलं नाही.
आता आम्ही नव्या जागेत आलो. आजहि मी कितीतरी वेळा 'पार्टीज्' ना जाते. त्यामध्ये
गम्मत नाही असं मुळीच नाही. त्याचीही एक वेगळी मजा आहे. त्या चकचकाटातही सफाईने
वावरता यायला हवं , पण जुन्या आठवणी ह्या कायमच सोबतीला असतात.
सफाईने टूथपिक् ने टोचून स्टार्टरस् खाताना मजेने फन्ना उडवलेली भजी आठवतात, अशा
वातावरणात आपल्या पार्टीतल्या माणसांची कशी तारांबळ उडाली असती किंवा त्यांनी
'ह्याच्यात काही मजा नाही, आपल्या पार्टीतच खरी मजा आहे असं नक्की म्हटलं असतं'
असे तरंग मनात उमटतच राहतात. असो.
हे दिवस मला अनुभवायला मिळाले हे काय कमी आहे? आता ते दिवस काही परत येणार
नाहीत, पण त्यांच्या आठवणी तर कोणी हिरावून घेणार नाही. आणि काय सांगावं... आम्ही
अजूनही कधी सगळे भेटतो.. एखादी अशी पार्टी अचानक होऊनही जाईल .. पूर्वीही ती
अचानकच व्हायची.. अगदी तशीच....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा