२०१२/०८/०१

वाटतं,

मऊ मऊ माती व्हावं 
कुंभाराच्या हाती घडावं  
वेलीवरचं फुल व्हावं
देवाच्या पायी निर्माल्य व्हावं
एक लहानशी लेखणी व्हावं
शब्द्सामार्थ्यातून  स्त्रवावं
चालना देणारी स्फूर्ती व्हावं
कृतार्थ करणा-या कलेचं रूप घ्यावं
वाहणारा गार वारा व्हावं
थकलेल्या पांथिकाला झुळुकीने सुखवावं
मेघ होऊन गर्जना करत यावं
बरसून सृष्टीला नवजीवन द्यावं
धारांतून जन्मून प्रवाही व्हावं
तृषार्ताला तृप्त  करावं

तेजोमय भास्कराचा एक अंश व्हावं
तिमिरातून प्रकाशाकडे न्यावं
निळं अथांग आकाश होऊन
मुक्त विहारी खगांना स्वैर उडू द्यावं
चोहीकडे रंगांची उधळण करत यावं
ते लेणं वसुंधरेने ल्यावं

पण महात्मा होऊ नये
कारण माझं लहानसं दुःख मला विसरता येत नाही
आणि मला शस्त्र व्हायचं नाही
कारण विसरता येऊ नये असं दुःख मला 
कुणालाच द्यायचं नाही.