हा मुंबईच्या लोकल मध्ये जवळ जवळ रोज घडणारा प्रसंग !
एक जेमतेम ४ वर्षांचा मुलगा ! फाटके कपडे, मळलेले अंग हातापायांवर छोटे ओरखडे, खरूज अशा वर्णनाचा !
त्याला काळ्या रंगाने एक मिशी काढलेली, डोक्यावर विचित्र आकाराची एक मळकी, फाटकी टोपी आणि टोपीला मधोमध एक दोरी. तोंडाने हिंदी चित्रपटातील गाणं म्हणत तो मान हलवत होता, त्याबरोबर ती दोरी गोलगोल फिरत होती. मग त्याने लोकलच्या दारात ठेवलेली एक रिंग उचलली. ती लोखंडी रिंग अगदी छोटी. १०-१२ इंच व्यासाची. त्यातून एक पाय, नंतर डोके आणि मग आपलं छोटं शरीर, अशी कसरत तो करू लागला.
या कसरतीने खुश होऊन बसलेल्या बायकांनी आपल्याला रुपया, दोन रुपये द्यावेत म्हणून तो हात पसरू लागला.
ह्या दृश्याचा माझ्यावर खूप काही गंभीर परिणाम झाला नाही, कारण म्हटलं तसं हे अगदी रोज दिसणारं दृश्य आहे. परिणाम तेव्हा झाला जेव्हा मी पाहिलं, की माझ्या समोर बसलेल्या दोन बायका आपल्या जवळच्या पुडीतून काही खात होत्या, त्यांच्या जवळून जाताना त्या मुलाने त्या पुडीकडे आशाळभुतासारखं पाहिलं आणि खाता खाता त्या दोघी त्या छोट्या मुलाकडे बघून हसू लागल्या.
ते बघून माझ्या काळजात लक्कन हललं. तो छोटा मुलगा किती तासांचा उपाशी असेल माहित नाही.
आपण 'भीक' देत नाही, कोणाला फुकटचं काही देऊ नये, अशाने आपण त्यांना बांडगुळाप्रमाणे जगण्याची सवय लावतो इ इ स्पष्टीकरणं ठीक आहेत, पण ......
एक इतका लहान मुलगा, ज्याला कदाचित तो काय करत आहे, त्याचा अर्थही माहित नाही. आपण करत आहोत त्याला लोक किती तुच्छ समजतात हेही अजून त्याच्या निरागस बालमनाला समजायचे आहे. पण त्या दोन स्त्रिया , त्या प्रौढ आहेत, चांगल्या परिस्थितीतील आहेत. त्या जे करत आहेत त्याचा अर्थ त्यांना तरी समजतो आहे का?
तो त्यांना आपण समजावून द्यावा , कि आपल्याला काय करायचं म्हणून सोडून द्यावं ? कि काहीच न करता नुसतं हळहळत बसावं? कि आपण उठून त्या मुलाला काहीतरी देऊन प्रश्नाचं तात्पुरतं उत्तर दिल्याचं समाधान मानावं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा