२०१२/०९/०६

नेगल

जागतिक वसुंधरा दिवस आणि आजच मला ह्या पुस्तकाविषयी लिहावेसे वाटावे हा एक चांगला योगायोगच म्हणायला हवा.
डॉ. प्रकाश आमटे यांचे नाव सर्वश्रुत आहेच.  त्यांचे सहकारी श्री. विलास मनोहर यांनी लिहिलेले 'नेगल' हे पुस्तक म्हणजे अनुभवांचा एक खजिनाच आहे.
हेमलकसा येथे आदिवासींसाठी काम करताना शिकार झालेल्या वन्य प्राण्यांची पिल्ले वाचवण्याचा एक उपक्रम सुरु झाला. आदिवासींचे बरेच समुपदेशन केल्यावर, ते त्यांनी शिकार केलेल्या वन्य प्राण्यांची पिल्ले हेमलकसा प्रकल्पावर आणून देऊ लागले, वन्य प्राण्यांना, लहान पिलांना वाचवण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले.
विलास मनोहर यांनी लिहिल्याप्रमाणे आधी ते स्वतः शिकारीसाठी जात असत. पण हेमलकसा प्रकल्पात सहभागी झाल्यावर त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला असं म्हटलं तर हरकत नाही.
आजपर्यंत ह्या प्रयत्नांमुळे अनेक प्राण्यांना जीवदान मिळाले आहे. रानमांजरापासून ते बिबट्या-सिंहापर्यंत आणि अनेक पक्ष्यांसोबत हा प्रवास सुरु आहे. माणसाच्या रक्ताला चटावणारा प्राणी अशी ओळख असणारा बिबट्या डॉक्टरांच्या मुलीसाठी खेळातला घोडा सुद्धा व्हायला तयार झाला. लेखकाच्या म्हणण्यानुसार हा चमत्कार नाही, तर ही प्रेमाची शक्ती आहे.
काही काळापूर्वी शिकारीसाठी जाण्याऱ्या विलास मनोहरांकडून आलेली ही प्रतिक्रिया हृद्य वाटते.
तरीही ते प्रांजळपणे सांगतात, की  'आज इतक्या वर्षांनंतरही प्रकाश ज्या विश्वासाने प्राण्यांना हाताळू शकतो, त्याला तोड नाही व मी कुठेतरी कमी पडतो. माझापेक्षा त्याच्यावर प्राण्यांचे प्रेम काकणभर अधिक आहे'. विशेषतः ही गोष्ट बिबट्याच्या संदभार्त त्यांनी लिहिली आहे.
प्रकल्पावर आलेल्या वेगवगळ्या प्राण्यांच्या सवयी, त्यांचे हट्ट, त्यांच्या लाड करून घ्यायच्या पद्धती, त्यांच्या आवडत्या व्यक्ती अशा विविध अनुभवांचा खजिना आपल्यासमोर त्यांनी मांडला आहे. आईने आपल्या बाळाचे कौतुक सांगावे, त्या ममतेने त्यांनी आपल्या या बाळांचे कौतुक सांगितले आहे.   (अर्थात प्राण्यांना सुद्धा आपल्यावर प्रेम करावेसे वाटावे, ह्यासाठी त्यांना आईचेच अतुलनीय प्रेम दिले पाहिजे - जे डॉ. प्रकाश आणि त्यांचे सर्व सहकारी देत आहेत.)
काही ठिकाणी सुविधांच्या अभावाचा, सरकारी असहकाराचा, अनास्थेचा उल्लेख केला आहे. जागेच्या, सुविधांच्या, आर्थिक मदतीच्या अभावामुळे अनेक प्राणी, जे अगदी लहान असताना प्रकल्पावर आले होते, त्यांना दुःखी मानाने परत जंगलात सोडून द्यावे लागले. पण मोकळ्या जंगलात वावरणे, स्वतःचे अन्न स्वतः मिळवणे हाच त्यांचा निसर्गधर्म असल्याने सगळ्यांनी मनावर दगड ठेवला. मात्र अशा जंगलात परत गेलेल्या, टोळीत समाविष्ट झालेल्या एका माकडाने नंतर अनेक दिवसांनी त्या भागात परत आल्यावर ओळखल्याची लक्षणे दाखवल्याचे त्यांनी आवर्जून लिहिले आहे.
आपल्या प्रेमाची पावती माणसांपेक्षा प्राणीच जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात असा आशय त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो. 'केलेले उपकार विसरायला तो माणूस थोडाच होता?' अश्या आशयाचे एक वाक्य त्यांनी वापरले आहे. एक अनुभव सांगताना ते म्हणतात, 'रानटी प्राणी असे हिणवणाऱ्या बायका अस्वल (राणी नावाचे प्रकल्पावरील अस्वल) दिसताच पळून जाऊ लागल्या आणि मुलांना उचलून घ्यायचे ही भान राहिले नाही.'  (मग बिरबलाच्या गोष्टीतील माकडिणीला नावे का बरं ठेवायची?)
आतापर्यंत आलेल्या अनुभवांचे कथन करताना, काही प्राण्यांच्या मृत्यूने झालेले दुःख, ह्या परिवारात नव्याने आलेल्यांचे कौतुक हेही आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. पण त्याच बरोबर अनिश्चित अशा  भविष्याविषयी चिंताही व्यक्त केली आहे.
वसुंधरा दिनारोजी आज हे माझे हेमलकसा प्रकल्पाला छोटेसे योगदान. पुढे असेच कार्य हातून घडो हे देवाकडे प्रार्थना आणि डॉ. प्रकाश , विलास मनोहर ह्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: