२०१३/०१/०९

रंगीत त्रिकोण

नवीन android फोन घेतल्याचा सर्वाधिक फायदा आणि आनंद कोणाला झाला असेल तर तो माझ्या भाचीला..  सईला... आधीच तिला चित्र आणि रंगांची प्रचंड आवड ..  आवड म्हणजे तिला नादच आहे तो.  कागदाचा दुसरा उपयोग जणु तिला माहितच नाही. त्यामुळे नवीन फोनवर चित्र काढता येते याचा तिला पत्ता लागला आणि तो फोन घरी येताच तिची गोड भुणभुण माझ्या मागे सुरु झाली. फोन हातात येईपर्यंत एकदा रडूनही झाले.

एकदाचा तो फोन तिच्या हातात  मिळाला आणि मग काय रंग आणि आकारांचे एक अवकाशच आमच्या समोर आले. तिची करामत बघून मला असे वाटले कि इतके रंग आणि इतके विविध आकार आहेत हेच मला महित नाही कि काय? एक एक क्षण आणि एक नवी आकृती , एक नवा रंग....
तिची कला पाहता पाहता मला माझ्या मनाचे चित्र समोर दिसू लागले. विचारांचे एक अवकाश... एक एक क्षण आणि एक नवा विचार.
सईची आता मजा विचारायलाच नको........रंग आणि आकार घेऊन आलेल्या त्या फोनवर तिचे विशेष प्रेम बसले आहे. मावशीचा फोन मस्त आहे याबाबत दुमत नाही.
तिच्या मनातले कितीतरी देखावे आमच्या समोर अगदी थोड्या वेळात अवतरले. तिचा विचारी (!) स्वभाव,
सईची लाडकी पणजी 
चंचलपणा, मस्ती, तिची निरागसता, तिचा मिस्कील स्वभाव ह्या सगळ्यांची एक एक झलक त्या रंग रेषांच्या संमेलनातून हळूहळू अलगद अवतरत होती. हट्टीपणाने, "नाही मला हाच रंग आवडतो.. मावशीने सिलेक्ट केलेला रंग घाण  आहे...." असे म्हणून हट्टाने निवडलेला रंग....इथे गोलच हवा...इथे तिरकी रेष नको... कर्व्ह हवा आणि काय काय....  तो फोन पण बिचारा दमला पण सईचा उत्साह अमाप... न संपणारा ... एका कल्पनेतून दुसरी कल्पना... एका आकारातून दुसरा आकार आणि असंख्य रंगांच्या छटा ....
आणि दुसरे महत्वाचे कारण कि तिला जसे चित्रांचे वेड  तसे मला फोटोचे आणि तिने जसे त्या फोनला दमवले तसे मीही ...  फोटो काढून काढून ...  एका 'टच' सरशी एक फोटो आणि त्यात 'इफेक्ट्स' ची बरसात ....  त्यामुळे तिच्या कडून फोन खाली ठेवला गेला कि मी तो उचललाच ...  मावशीने फोन हात घेतला कि ती फोटो काढत सुटते हे तिला हि माहित ... तिचे अनेक हावभाव  ... मूड्स नखरे आज त्या फोन मध्ये साठवले आहेत. सई आणि तिची पणजी , सई आणि तिची मावशी, सई आणि आमचा बोकू .... कितीतरी क्षण त्यात साठवले आहेत.
मी, सई  आणि तो फोन असा एक त्रिकोणच तयार झाला. रंगीबेरंगी  आठवणींचा .....एखाद्या
dWलिडोस्कोपसारखा   ............त्यात जसे विविधरंगी  काचांचे ठराविक तुकडे असतात पण त्यातूनच अनेकविध आकृत्यांचे  सुंदर तरंग फुलतात. तसेच आम्ही तिघच .. पण प्रसंग आणि त्या आठवणी अनेक.. ..


दोन दिवसांनी सई तिच्या  आई - बाबांबरोबर तिच्या घरी जाईल. पुढच्या सुटीत ती पुन्हा राहायला येईल तोवर तो  WdWलिडोस्कोप स्वतः तल्या आठवणींनी आम्हाला ताजंतवानं  ठेवेल, आमच्या वाट बघणा -या मनाला नवी चेतना  देत राहील.




1 टिप्पणी:

Shriraj म्हणाले...

kadachit mhanunach androids itke prachalit ahet... yat pratyekasathi kahi na kahi ahe :)