२०१३/०२/०४

लपंडाव

लबाड मन माझ्याशीच लपाछपी खेळतं ...
घाईगर्दीत चालताना , अचानक लक्षात येतं , मन रुसून बसलेलं असतं...
माझ्या गतीपेक्षा  मागे पडलेलं असतं,
मी घाईने पुढे जाते म्हणून रुसलेलं असतं.
बोथट झालेले त्रासदायक कंगोरे आठवून , उगाळून उगीचच त्यांना धार लावत असतं...
कितीही समजावलं तरी ते ऐकत नाही
आपला हट्ट  ते कधी सोडत नाही.....  तरी मी समजूत काढत राहते.
"अरे जरा इतरांची दुःख बघ ..आपण दोघं किती बरं सुखी"
माझं प्रवचन पूर्ण होतं , न होतं,
मन इकडे तिकडे बघतं आणि परत हळूच त्या कंगो-यांकडे वळतं.
शहाणपणा शिकवण-या माझ्याकडे रुसून बघत राहतं.
मनाला सारखं ताळ्यावर आणत रहावं लागतं.
हे कर , ते कर असं  त्याला  सारखं गुंतवावं लागतं.
सारखं असं आंजारून गोंजारून मी कंटाळून जाते...
खरंच का माझं मन बिचारं दुःखी ?
असं म्हणत त्या चकव्यात गुरफटत जाते.


मग लबाड मन माझ्याकडे बघतं हळूच हसतं ... मिश्कीलपणे..
पोक्तपणाचा आव आणून 'कन्फूशिअस' होतं.
मी मघाशी बांधलेलं शहाणपणाचं गाठोडं उलगडायला लागतं.
माझ्या सुखाच्या राशी माझ्या डोळ्यांपुढे उभ्या करतं.
स्वप्नांच्या रंगीबेरंगी इंद्रधनूवर अलगद तरंगू लागतं ...  ठेंगू जादुगारासारखं ,
क्षुल्लक गोष्टींवर खदखदून हसतं ...  आणि मलाही हसायला लावतं.

खरंच किती मी वेडी...
कशी फसते त्या फसव्या मनाच्या फसव्याला...


वेड्याची मी परत शहाणी होते आणि
शहाण्या  मनाला  माझं बोट धरायला देऊन पुढे चालू लागते.
चार पावलं गेल्यावर पाहते तर काय ....

बोट सोडून लबाड मन रस्त्यातच फतकल् मारून बसलेलं असतं
तेच फसवे कंगोरे शोधून पुन्हा
माझ्याशी लपंडाव खेळण्यात रमलेलं असतं.....



२ टिप्पण्या:

Shriraj म्हणाले...

Devane sarvat changle kahi kele asel te he ki dusryachya manat kay challe ahe te aplyala olakhta yet nahi (yala kadachit apvad astil)

Devashri म्हणाले...

दुस-याच्या काय, कितीतरी वेळा माणसाला स्वतःच्याच मनात नक्की काय आहे हे कळत नाही. मनात सुप्त विचार वेगळेच असतात आणि गोंधळात पडून वेगळाच विचार केला जातो. जेंव्हा अशी परिस्थिती तयार होते तेंव्हा कदाचित मनाला असा लपंडाव खेळावा लागतो आणि आपल्याला नक्की काय हवे आहे ते बुद्धीपर्यंत पोहोचवावे लागते. :) हे आपले माझे मत :)