२०१३/०३/१०

उपास

आज महाशिवरात्र . माझ्यासारखे उपासाची अँलर्जी असणारे लोकही हा उपास सहसा टाळत नसतील. कोपिष्ट महादेवाच्या भितीने असेल कदाचित.....पण कुठलाही देव का असेना.... आपण मन मानेल ते करायचं.... कोपिष्ट महादेव असला म्हणून काय झाले? जिथे 'तिसरा डोळा' नावाची डिटेक्टिव्ह मालिका निघाली अशा ठिकाणी आपल्या तिस-या डोळ्याचा काय पाड, या चिंतेने बसला असेल बिचारा. पण आज अगदी दिवसभर अभिषेकांना तोंड देत सगळ्यांना आशिर्वाद मात्र नक्की देईल.
तर मुख्य प्रश्न आहे उपासाचा. एकादशी दुप्पट खाशी हे कोणीतरी आधीच म्हणून आणि त्यातच आपल्या उपासचं बिंग फोडून ठेवलं आहे. आणि असं ही आपण बुवा खिचडीसाठी उपास करतो हे सांगून अनेकजण  बिचारे त्या विधानाला पुष्टी देण्यासाठीच तर धडपडत आहेत. हो... वाडवडिलांनी सांगितलेलं जर खोटं ठरलं तर मग काय प्रतिष्ठा राहिली.... नाही काय? माझं तर फारच ढोबळ धोरण आहे या बाबतीत.. "उपास करणार का?" असं विचारलं की तिरकी मान हलवायची..शक्यतो तोंडी उत्तर देणे मी टाळतेच. समोरच्याने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावावा. त्यामुळे उपासाच्या बाजूने आणि उपासाच्या विरोधी अशा दोन्ही बाजूने बसणारी बोलणी टळून दोन्ही पद्धतीच्या पदार्थांवर ताव मारता येतो.  हे भांड नंतर फुटतं आणि "मग विचारलं तेंव्हा म्हणाली की उपास करणार ....मग म्हणाली की नाही.. नुसती मान हलवायची..बोलायचं नाही " इ. इ. बाण अंगावर येतात, पण पोट भरलेलं असल्याने फार ईजा न होताच आधीच मी वामकुक्षीची सीमा ओलांडून गाढ झोपेच्या मार्गाला लागलेली असते.
आणि या उपासाची एक गमतीदार आठवण ......एकदा ऑफिसमधील आम्ही सात आठजण पिकनिकला गेलो होतो: अर्थातच अर्धा शुक्रवार वीकेंडमध्ये धरून..एकीचा शुक्रवारचा उपास होता आणि एकीचा शनिवारचा. कर्मधर्मसंयोगाने आम्हाला उशीर होऊन शुक्रवारी रात्रीच्या जेवणासाठी रेस्टराॅं सापडायला अकरा-साडेअकरा वाजले. शनिवारचा उपासवाली म्हणाली "उद्या काही नाॅनव्हेज खाता येणार नाही.त्यामुळे मी आता खाते." झाले.....शुक्रवारच्या उपासवालीचे असंही दिवसभरच्या उपासाने आणि आम्ही तिच्या नाकावर टिचून केलेल्या चरंतीमुळे पित्त खवळले होते. नाॅनव्हेजचे नाव काढताच तिचे अवसान गळाले. पण करणार काय? असं पाहिलं तर दिवस संपायचा होता. उपास मोडला असता. त्या दोघींचा घोळ एकीकडे चालू होता तोवर आम्ही ऑर्डर दिली. शनिवारवाली मजेत आस्वाद घेऊ लागली. शुक्रवारचीला काही उपासाचा घास गोड लागेना. तिची चलबिचल होत होती. गप्पा आणि हसण्या-खिदळण्यात वेळ गेला. एकाएकी शनिवारवाली झटक्यासरशी उठली. १२.०० वाजायला अगदी अर्धा-एक मिनिट बाकी होता. घाईने जेवण कसंबसं संपवलेलं तिने. जीवाच्या आकांताने धावली तोंड धुवायला. आल्यावर म्हणते"..मग मी नजर ठेवून होते घड्याळावर. आता  शनिवार सुरु झाला नं. मग त्याच्या आत नॉनव्हेजचे तोंड धुवायचे होते....:-) " शुक्रवार संपला हे कानावर पडताच ...दुसरीला अशी टवटवी आली ...जणु अनेक वर्षांचा उपास घडला होता. इतका वेळ बिचारी हिरमुसल्या चेहे-याने बसली होती. देवीलाच दया आली आणि शुक्रवार संपला एकदाचा. तिने मागवलेल्या डिशेस् वर यथेच्छ ताव मारला. आणि आता शनिवारवाली ....इतका वेळ शनिवार सुरू व्हायची वाट बघत होती, ती आता पुन्हा घड्याळाकडे वळली....शनिवार संपायची वाट बघत. एक वेळचा उपास, धान्यफराळ, निर्जळी उपास, अळणी उपास असे प्रकार तर पाहिले होते. पण असा काट्यावरचा उपास ....तो त्यावेळी बघायला मिळाला.