मध्य रेल्वेला मी कितीही नावे ठेवत असले, तरीही तिचे तोंड बघितल्याशिवाय माझा दिवस काही सफल होत नाही. तिला मिळालेले lifeline हे नाव खरेच सार्थ आहे. रोजची ठेवलेली 'नावे' ही त्या त्या दिवसाच्या त्रास, गर्दी व उशिरामुळे ठेवलेली असतात, पण दर नव्या दिवशी मी त्याच उत्साहाने तिच गाडी पकडायला धावपळ करत असते.
तिचे आभार मानायचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, तुटले… तुटले असे वाटणारे अनेक दुवे तिने अलगद जोडून दिलेले आहेत. माझाही एक असाच दुवा काही दिवसांपूर्वी तिने जोडून दिला. माझी एक जुनी, मी अकरावीत असतानाची मैत्रीण मला अचानक भेटली. मध्ये अनेक वर्ष आमचा काहीही संपर्क नव्ह्ता.
खरं तर रूढार्थाने तिला मैत्रीण तरी कसे म्हणावे? आमचा फोन नंबर सुद्धा एकमेकींकडे नव्ह्ता. कॉलेजमध्ये असताना ती आणि मी दोघी अगदी अभ्यासू मुली होतो. त्यामुळे आम्ही कधी एकत्र सिनेमा, हॉटेल असेही काहीही केले नाही. आम्ही कधी 'सिक्रेट्स' एकमेकींना सांगितली नाहीत, पण त्याच अभ्यासाचा एक समान चिवट धागा आमच्यात होता आणि तो कायम आहे हे त्या अचानक झालेल्या भेटीत कळून आले.
आमच्या दोघींच्या खूप गप्पा झाल्या. अनेक जुने नवे विषय त्या तासाभराच्या भेटीत झाले. एक जुना ऋणानुबंध कायम आहे याची सुखद जाणीव खूप उर्जा देऊन गेली. मध्ये अनेक वर्ष काही संपर्क नसूनही काय बोलावे असा प्रश्न काही पडला नाही आणि एक तास कसा गेला ते समजलेही नाही.
दुस-या दिवशी गाडी पकडताना नकळत माझ्या धावपळीत उत्साहाची चिमुट पेरली गेली होती. रोज रोज त्याच चक्रातून जाताना त्याच माझ्या रोजच्या गाडीने मला सरप्राइज दिलं होतं, आपण एखाद्या मैत्रिणीला अचानक काही कारण नसताना द्यावं तसं…मी तिला नावे ठेवत होते तरीही ती माझ्यावर रागावली नव्हती. मनोमन मी तिला धन्यवाद दिले. इतक्या मोठ्या गाडीत मी कोणत्या डब्यात , माझ्या ठरलेल्या जागेवर असणार हे ओळखून तिने माझ्या मैत्रीणीलाही बरोबर तिथेच बोलावून घेतल्यासारखं नेमकं आणलं. या भेटीमुळे मला आनंद होणार हे तिला बरोबर समजलं होतं.
मी तिचे आभार मानल्यावर तिला झालेला आनंद मला दिसला…समजला…. मी तिला म्हटलं… "मी तुला नावे ठेवत होते… माझ्यावर रागवू नकोस हं … ". ती म्हणाली, "अगं वेडी आहेस तू …. तुझ्या चक्राचा तुला किती कंटाळा आला होता ते माहित होतं … पण काय करू? … माझ्या चक्रातून मला सुटका मिळेल तर असं काही मला करता येईल नं …. म्हणून उशीर झाला तुमच्या भेटीला …"
मी हसून मान डोलावली .
ओळखीचं रुपांतर अचानक एखाद्या प्रसंगातून निरंतर मैत्रीत होतं …… त्या दिवसापासून आमची नवी मैत्री अधिकच घट्ट झाली आहे.
1 टिप्पणी:
mastach! mazya 'local' athvani jagya zalya
टिप्पणी पोस्ट करा