हे पुस्तक जेव्हा वाचनात आले, तेव्हा त्यातील सगळ्या गोष्टींचा अर्थ कळण्याचे वय नव्हते. ती एक साधी गोष्ट म्हणून वाचली, आवडली तर होतीच .. आणि पुस्तक कपाटात मागे ठेवून दिले. थोड्या थोड्या महिन्यांनी असे तीन - चार वेळा ते पुन्हा पुन्हा वाचले गेले. प्रत्येक वेळी जेव्हा ते वाचले, त्यावेळी काही नवीन अर्थ समजत गेला. काही नवीन असे दर वेळी उलगडत गेले.
मग एकदा पूर्ण पुस्तक पुन्हा वाचल्यानंतर पुस्तकाचे कव्हर सुद्धा नव्याने समजल्यासारखे वाटले.
अठराव्या शतकातील अँन आणि हेनरी ह्या इंग्लंड मधून येऊन कलकत्त्यात स्थाईक झालेल्या जोडप्याची ही गोष्ट आहे आणि केवळ त्यांचीच नाही तर त्या काळच्या कलकत्त्याची, त्यांच्या बंगल्याची, बंगल्यातल्या नोकरांची, हे जोडपे आणि नोकरांचे परस्पर संबंध हे सगळं परस्परांत इतकं गुंफलं गेलं आहे, की त्या सगळ्याची मिळून एक कहाणी तयार होते आणि ती आपल्याला गुंगवून टाकते.परक्या जोडप्याला सवय करून घ्यायच्या अनुषंगाने इथली विविधरंगी संस्कृती,
इथल्या गरीब नोकरांच्या निष्ठा, सण, हिंदुस्तान्यांच्या ब्रिटीशांविषयीच्या
चांगल्या - वाईट भावना हे कहाणीतले एक एक महत्वाचे पैलू आहेत.
लग्नापूर्वी भारतात एकट्या राहणा-या हेनरी चे त्याला घेऊन जणा-या नावाड्याच्या बायकोशी संबंध येउन तिला एक मुलगा होतो. त्या मुलाच्या अर्धवट अशा 'identity' विषयी अँन आणि हेनरी चे मनोविश्व उलगडते, त्याच वेळी त्यांच्या हे लक्षात येते की त्यांच्या स्वतःच्या दोन मुलांचीही हीच परिस्थिती आहे. ती मुले 'हिंदुस्तान' आणि 'इंग्लंड' या दोन भिन्न अशा संस्कृतीत कदाचित लोंबकळत राहतील. स्वतः अँन हि सुद्धा हिंदुस्तानाला परके मानते , ती प्रत्येक क्षणाला तिच्या 'homeland' ची आठवण काढतच जगते. हिंदुस्तानाचा तिटकारा तिच्या मनात इतका भरलेला आहे, की तिला इथली , ह्या वातावरणात वाढणारी झाडेही नकोशी आहेत, तिला इंग्लिश रोपे आवडतात, तिला हिंदुस्तानी खानसाम्याने बनवलेले पदार्थ बिलकुल आवडत नाहीत. आणि खरे संकट तेंव्हा येते, जेंव्हा तिची धाकटी बहिण मिशनरी बनून कायमस्वरूपी भारतात येते. अँनचे एकाकी जगणे कुठेतरी तिच्याविषयी अनुकंपा निर्माण करत होते. केवळ पत्रासाठी दीड महिना वाट बघणे, ठराविक काळाने यांत्रिकपणे मुलांना जन्म देत राहणे, त्यांना सांभाळणा-या हिंदुस्तानी आयां विषयी राग, भाषेची अडचण, 'ब्रिटीश राज' ची बंधने, आणि असे हिंदुस्तानी वातावरण ज्याच्याशी ती जुळवून घेऊ शकत नाही, हे सगळे तिच्याविषयी मला राग आणत नव्हते, तर तिची घुसमट माझ्या पर्यंत पोहोचवत होते.
'व्हिक्टोरियन' काळात असल्याने कुटुंबाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदार असणा-या अँनला नव-याच्या परस्त्रीशी आलेल्या संबंधांचे परिणाम स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. त्यावेळची तिची तडफड एक स्त्री म्हणून आहे आणि त्या गोष्टीला काळाचे बंधन नाही ती गोष्ट ('व्हिक्टोरियन' काळाच्या संदर्भाशिवाय ) आजही लागू आहे. हे सगळं कळण्याइतकी जेंव्हा मी मोठी झाले तेव्हा पुस्तकाच्या प्रस्तावनेचा अर्थ खोलवर समजला - इतिहासाला वारस लागतात. ते वारस स्त्रियांनी पुरवले, पण त्या स्त्रियांची इतिहासात नोंद तरी होईल का? - सर्वस्वी अशा परक्या , मागासलेल्या वातावरणात ज्या ब्रिटीश (किंवा तशाच इतर अनेक देशांतून आलेल्या) स्त्रियांनी घरे उभी केली आणि वारस पुरवले, त्यांची जणू काही ओळखच नाही.
हेनरी निवृत्त होऊन जेंव्हा ती दोघे इंग्लंडला परत जातात , त्यावेळी अगदी उलट परिस्थिती होते. त्यांची दोन्ही मुले लग्न करून भारतात निक्रीसाठी मागे राहतात, हेनरीचा आणि मरियम (नोकराणी) चा मुलगा इथे राहतो आणि सगळ्या आठवणी फक्त आणि फक्त हिंदुस्तानाशीच निगडीत अशा मागे उरतात. ज्या तडफडीला अँन आणि हेनरी आयुष्यभर सामोरे गेले, आणि एके दिवशी इंग्लंडला परत जायच्या आशेवर त्यांनी इथले आयष्य काढले त्याच तडफडीला त्यांना आता कायमचे सामोरे जायचे आहे, कारण आता त्यांच्या प्रत्येक क्षणावर हिंदुस्तानी आठवणींचे सावट आहे.
काही वर्षांपूर्वी ते जेंव्हा हिंदुस्तानात आले, त्यावेळी इंग्लंडमधील व इथल्या परिस्थितीत काहीच साम्य नव्हते आणि आताही तीच परिस्थिती आहे, फक्त आता ते इंग्लंडमध्ये आहेत.
'विदेश' ची अनेक पारायणे केल्यावर माझ्या मनावर ठसा उमटला आहे तो कव्हरवर असणा-या मंद प्रकाशात एकाकी बसलेल्या अँनचा. माझ्यासाठी ही कहाणी प्रामुख्याने अँनची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा