गुण गाईन आवडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुण गाईन आवडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१४/०१/०२

थोडेसे वेगळे




काही वेळा असे प्रसंग येतात की आपले जे काही आखलेले प्लान्स,  आपल्या इच्छा असतात, त्या इतक्या अचानक बाजूला सारल्या जातात, आणि काहीतरी वेगळेच, एकदम अनपेक्षित असे आपल्यासमोर येते. त्याला तोंड देण्याशिवाय कुठचाच पर्याय शिल्लक नसतो. गडबडून जायला होते. आता पुढे कसे होणार याची चिंता भेडसावायला लागते आणि अशा वेळीच त्याची हटकून  आठवण होते. एरव्ही एका उदबत्तीवर किंवा एका झटपट नमस्कारावर त्याला इतके दिवस आपण त्याला भागवायला लावले हे चुकले तर नाही? त्याची शिक्षा तर तो देत नाही न? असे काही तरी वाटायला लागते.
पण नाही !!! तसे काही नाही … तो इतका दयाळू आहे आणि जगाची जननी असणारा तो आपल्यावर इतके प्रेम करणारा आहे, की तो असे काहीही आपल्याबरोबर करणार नाही, आधी आपण त्याची आठवण काढली आहे की नाही, त्याची प्रार्थना केली आहे की नाही याचे हिशोब ठेवत नाही. उलट आलेल्या परिस्थितीतून इतक्या अलगदपणे तो आपल्याला बाहेर काढतो.  आणि परतफेड  करण्याची अपेक्षाही आपल्याकडून  ठेवत नाही.   मात्र हे कळण्यासाठी त्याला  थोडंसं समजून घ्यायची आवश्यकता आहे. थोडा वेळ त्याच्यासाठी काढण्याची आवश्यकता आहे.

२०१३/११/२०

श्लोक

जुनी पुस्तके चाळताना एक श्लोक अचानक पुन्हा वाचनात आला.

डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो,

जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाणी परि बोलतो

हाताने बहुशाल काम करतो, विश्रांतीहि घ्यावया

घेतो झोप  सुखे, फिरुनि उठतो ही ईश्वराची दया !!!

 कोणतेही गहन गंभीर शब्द न वापरता फार मोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगितले आहे, नाही का?
कोण देवावर विश्वास ठेवतो, कोण नाही, या वादात पडण्यात काही अर्थ नाही. परंतु श्लोक चांगला आहे, एव्हढे नक्की !!!!

२०१३/०६/०८

फूट ओव्हर

काल रोजच्या प्रमाणे गाडीतून उतरून पूल ओलांडून मी फूट ओव्हर वरून चालले होते. तिकडे बाजूच्या एका इमारतीच्या गच्चीवर विशीच्या आसपासचा एक मुलगा आणि त्याचा कुत्रा खेळण्यात मग्न होते. इतके … की त्या फूट ओव्हर वरून जाणारे किती तरी लोक त्यांच्याकडे बघत होते, त्याकडे त्यांचे लक्षही नव्ह्ते.  मी सुद्धा माझा वेग कमी करून त्यांच्याकडे पाहत पाहत कडेने चालत होते… थोडी रेंगाळतच … रोज मी तो फूट ओव्हरच पसंत करते जाण्याकरता … कारण तेच, खाली रस्त्यावर असणारी वाहनांची गर्दी , धूर आणि आवाज टाळायचा असतो. वरून जाताना आवाज टळत तर नाही पण तीव्रता कमी होते … धूर आणि अंगावर येणा-या वाहनांपासून सुटका होते. शिवाय मोकळा वारा येतो. पण असे सुंदर दृश्य मात्र कधी पाहायला मिळाले नव्हते. ते दोघे… एकमेकांपासून अगदी भिन्न …. वृत्ती , प्रवृत्ती , रंग रूप सगळ्याच दृष्टीने अगदी भिन्न …पण त्या क्षणी एकमेकांत इतके रममाण झालेले की त्यांना जगाचे भानही नव्ह्ते. जणू त्या दोघांना एमेकांशिवाय कोणी नव्ह्तेच. आपापल्यातच ते अगदी पूर्ण असलेले … स्वत्व विसरून दुस-यासाठी असणारे. त्या मुलाच्या चेहे-यावर अतिशय आनंद आणि तो अधोरेखित करणारे निखळ हसु…… आणि त्या कुत्र्याचा आनंद देहबोलीतून व्यक्त होत होता …. उड्या मारताना , मागे पुढे , उलट-सुलट पळताना तो नुसता उसळत होता. दोन मित्र आपल्या मैत्रीतच रमले होते …. मैत्रीचं प्रदर्शन करण्याकरता?  नव्हे …. ते अगदी सहज असे रमले होते. कदाचित आपापली दुःख थोड्या कालापुरती समोरच्याला विसरायला लावत होते.
आणि मला हे दाखवणारा तो फूट ओव्हर……ह्या कारणामुळे तो मला अधिकच आवडू लागला.


मग आपले विचारचक्र नेहेमीसारखे सुरूच असते ……. कधी कधी आयुष्यात अशा फूट ओव्हर ची खूप गरज असते, रोजच्या व्यवधानांची गर्दी आणि गडबड गोंधळाच्या प्रदूषणापासून सुटका करायला. त्याच त्याच वैचारिक आणि मानसिक गोंधळातून आपण भुलभुलैय्या असल्यासारखे फिरत असतो. असं का, तसं का, असं का झालं, तसं झालं असतं तर बरं झालं असतं ……. हे सगळं मागे टाकून , दूर सोडून मोकळा वारा  पिण्यासाठी गरज असते एका फूट ओव्हरची. आणि तेव्हा आपले मित्र- मैत्रिणी धावून येतात. आपल्यासाठी फूट ओव्हर होतात.

असेच  काही फूट ओव्हर मला नशिबाने मिळाले. कितीतरी दिवस आमची तोंडओळख होती. पण आम्ही बोलायचो मात्र नाही…. अगदी  हाय हॆलो  पुरतं सुद्धा नाही . एकाच ऑफिसमध्ये… पण खूप लांब असल्यासारखे . पण कळत नकळत एकमेकांच्या सवयी आणि वागण्याचे निरीक्षण करत असू बहुदा. अंदाज घेत असल्यासारखे आणि एके दिवशी अचानक आम्ही प्रदुषणापासून सुटका करून घेतली. जेव्हा मी फूट ओव्हर वरून त्या मुलाचं आणि कुत्र्याचं दृश्य पाहिलं त्यावेळी मला पहिली आठवण माझ्या मनातल्या फूट ओव्हरची झाली. आम्ही अगदी गंभीर  बोलतो, चर्चा करतो असं काही नाही. ब-याच वेळा आम्ही इतके बालिश वाद घालतो की आपलं वय , आपण जबाबदारी चं काही काम करत आहोत याचा अगदी आम्हाला विसर पडला असावा. पण ते बोलणं त्या गर्दी आणि प्रदुषणापासून खूप लांब नेतं …

 त्या फूट ओव्हरमुळे खूप उर्जा मिळते. धुरामुळे धूसर दिसणारी वाट स्वच्छ दिसायला लागते. अचानक काही आनंदाचे क्षण समोर येतात. पण एक मात्र आहे, फूट ओव्हर ओलांडून रस्त्याला लागलो , तरीही त्या फूूट ओव्हरला  विसरायचे मात्र नसतं आणि कधी आपणच त्याचा फूट ओव्हर व्हायचा प्रयत्न मात्र नक्की करायचा. 

२०१३/०२/२४

खारीचा वाटा

आज फेसबुक वर एक व्हिडिओ क्लिप पाहायला मिळाली. सुनिता कृष्णन्  नावाची एक अगदी आपल्यासारखी मुलगी 'human traffic' विरुद्ध विशेषतः लैंगिक अत्याचाराविरुद्ध काम करत आहे. त्यांनी सांगितले, की लहान वयात त्या स्वतः सामुहिक बलात्काराच्या बळी ठरल्या असून त्या घटनेने त्यांच्यात जी चीड निर्माण केली त्यापासून प्रेरणा घेऊन अगदी लहान वयात (१५/१६  व्या वर्षी) त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली. आपल्या बोलण्याच्या सुरुवातीला त्यांनी  ४ - ५ वर्षांच्या छोट्या ३ मुलींची कहाणी सांगितली ज्या त्यांच्या आई-वडिलांकडूनच अशा अत्याचारासाठी विकल्या गेल्या आणि काही काळातच त्या HIV positive होऊन मरण पावल्या. सुनिता यांनी आजपर्यंत ३००० हून अधिक मुली व स्त्रियांना या विळख्यातून सोडवले आहे आणि पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात (जसे वेल्डर , सुतार, इलेक्ट्रीशियन) त्यांना प्रशिक्षण देऊन स्वतः च्या पायावर उभे केले आहे. हेच व्यवसाय निवडण्यामागचे कारणही  सुनिता यांनी सांगितले, की त्या मुली आता देह -लाजेचा पडदा दूर करून पुढे आल्या आहेत. इतके अत्याचार त्यांनी सहन केले आहेत, की आता भोवताली अनेक पुरुष  वावरत असताना स्त्रीला सामान्यतः जो संकोच वाटतो, जी लाज वाटते त्या पलीकडे त्या मुली पोहोचल्या आहेत. आणि अगदी सहज पणे अशा व्यवसायात त्या आपला जम बसवू पाहत आहेत.


त्या नंतर त्यांनी एक प्रसंग सांगितला -- त्यांच्या एका हितचिंतकाच्या घरी कामासाठी एका मुलीची गरज असताना, त्यांनी सुनिता यांना अशी एखादी मुलगी कामासाठी मिळेल का ते पाहायला सांगितले, पण त्याच बरोबर ती मुलगी 'आपल्या कामाच्या परिवारातील नको' असे सांगण्यास तो हितचिंतक विसरला नाही. का बरे? सुनिता यांच्या म्हणण्याप्रमाणे सुशिक्षित आणि स्वतःला सुधारकी /सुधारित , पुरोगामी म्हणवणारा समाजच हे त्यांच्या पुढील मोठे आव्हान आहे. ह्या समाजासाठी त्यांनी 'culture  of  silence' - मूग गिळून गप्प बसण्याची संस्कृती असा शब्द प्रयोग वापरला आहे. जेव्हा अशा पिडीत व्यक्ती संबंधी प्रश्न उभे राहतात, त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढे येण्याची गरज वाटते, त्यांना आपल्यातील एक म्हणून स्वीकारण्याची गरज उभी राहते, तेव्हा  एरव्ही संमेलने, सभा भरवून अश्या विषयांवर चर्चा करणारे लोक पुढे येत नाहीत, किंबहुना अशा चर्चा , सभा इथपतच अशा पुरोगामी समाजाचे काम मर्यादीत राहते. (ह्या संदर्भात आपल्या कडे दिल्लीत घडलेली घटना आणि त्या नंतर झालेला प्रक्षोभ हे उदाहरण आठवले. अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याकरिता आणि योग्य अशा कायद्यांची मागणी करण्याकरिता अशा प्रकारची घटना घडणे आणि एका मुलीचे आयुष्य संपण्याची का गरज आहे??)


सुनिता यांनी आपल्या बोलण्यात लोकांना आवाहन केले आहे, की अगदी घर-दार सोडून अशा कामात झोकून  द्यायची प्रत्येकाला गरज नाही, पण प्रत्येकाने आपल्या आखून घेतलेल्या चौकटीत राहून, मौन सोडून जर अशा गोष्टी आणखी चार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय  केला आणि त्याद्वारे जरी समाजात अशा व्यक्तींना स्वीकारण्याचे  सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकले तरी खूप मदत होईल. अशा प्रकारच्या कामात किमान ह्या कार्याचा प्रसार करून खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो, नाही का?
https://www.facebook.com/photo.php?v=252570828098848&set=vb.232530536780583&type=2&theater
ही पोस्ट वाचणा-या मित्र मैत्रिणींनी ही लिंक कृपया शेअर करावी अशी नम्र विनंती !

२०१३/०१/१०

विदेश


                    हे पुस्तक जेव्हा वाचनात आले, तेव्हा त्यातील सगळ्या गोष्टींचा अर्थ कळण्याचे वय नव्हते. ती एक साधी गोष्ट म्हणून वाचली, आवडली तर होतीच .. आणि पुस्तक कपाटात  मागे ठेवून दिले. थोड्या थोड्या महिन्यांनी असे तीन - चार वेळा ते पुन्हा पुन्हा वाचले गेले. प्रत्येक वेळी जेव्हा ते वाचले, त्यावेळी काही नवीन अर्थ समजत गेला. काही नवीन असे दर वेळी उलगडत गेले.

मग एकदा पूर्ण पुस्तक पुन्हा वाचल्यानंतर पुस्तकाचे कव्हर सुद्धा नव्याने समजल्यासारखे वाटले.

                     अठराव्या शतकातील अँन आणि हेनरी ह्या इंग्लंड मधून येऊन कलकत्त्यात स्थाईक झालेल्या जोडप्याची ही गोष्ट आहे आणि केवळ त्यांचीच नाही तर त्या काळच्या कलकत्त्याची, त्यांच्या बंगल्याची, बंगल्यातल्या नोकरांची, हे जोडपे आणि नोकरांचे परस्पर संबंध  हे सगळं परस्परांत इतकं गुंफलं गेलं आहे, की त्या सगळ्याची मिळून एक कहाणी तयार होते आणि ती आपल्याला गुंगवून टाकते.परक्या जोडप्याला सवय करून घ्यायच्या अनुषंगाने इथली विविधरंगी संस्कृती, इथल्या गरीब नोकरांच्या निष्ठा, सण, हिंदुस्तान्यांच्या ब्रिटीशांविषयीच्या चांगल्या - वाईट भावना हे कहाणीतले एक एक महत्वाचे पैलू आहेत.
                         लग्नापूर्वी भारतात एकट्या राहणा-या हेनरी चे त्याला घेऊन जणा-या नावाड्याच्या बायकोशी संबंध येउन तिला एक मुलगा होतो. त्या मुलाच्या अर्धवट अशा 'identity' विषयी  अँन आणि हेनरी चे मनोविश्व उलगडते, त्याच वेळी त्यांच्या हे लक्षात येते की त्यांच्या स्वतःच्या दोन मुलांचीही हीच परिस्थिती आहे. ती मुले 'हिंदुस्तान' आणि 'इंग्लंड' या दोन भिन्न अशा संस्कृतीत कदाचित लोंबकळत  राहतील.  स्वतः अँन हि सुद्धा हिंदुस्तानाला परके मानते , ती प्रत्येक क्षणाला तिच्या 'homeland' ची आठवण काढतच जगते. हिंदुस्तानाचा तिटकारा तिच्या मनात इतका भरलेला आहे, की तिला इथली , ह्या वातावरणात वाढणारी झाडेही नकोशी आहेत, तिला इंग्लिश रोपे आवडतात, तिला हिंदुस्तानी खानसाम्याने बनवलेले पदार्थ बिलकुल आवडत नाहीत. आणि खरे संकट तेंव्हा येते, जेंव्हा तिची धाकटी बहिण मिशनरी बनून कायमस्वरूपी भारतात येते. अँनचे एकाकी जगणे कुठेतरी तिच्याविषयी अनुकंपा निर्माण करत होते. केवळ पत्रासाठी दीड महिना वाट बघणे, ठराविक काळाने यांत्रिकपणे मुलांना जन्म देत राहणे, त्यांना सांभाळणा-या हिंदुस्तानी आयां विषयी राग, भाषेची अडचण, 'ब्रिटीश राज' ची बंधने, आणि असे हिंदुस्तानी वातावरण ज्याच्याशी  ती जुळवून घेऊ शकत नाही, हे सगळे तिच्याविषयी मला राग आणत  नव्हते, तर तिची घुसमट माझ्या पर्यंत  पोहोचवत होते.
                   'व्हिक्टोरियन' काळात असल्याने कुटुंबाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदार असणा-या अँनला नव-याच्या परस्त्रीशी आलेल्या संबंधांचे परिणाम स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. त्यावेळची तिची तडफड एक स्त्री म्हणून आहे आणि त्या गोष्टीला काळाचे बंधन नाही ती गोष्ट ('व्हिक्टोरियन' काळाच्या संदर्भाशिवाय ) आजही लागू आहे. हे सगळं कळण्याइतकी जेंव्हा मी मोठी झाले तेव्हा पुस्तकाच्या प्रस्तावनेचा अर्थ खोलवर समजला -  इतिहासाला वारस लागतात. ते वारस स्त्रियांनी पुरवले, पण त्या स्त्रियांची इतिहासात नोंद तरी होईल का? - सर्वस्वी अशा परक्या , मागासलेल्या वातावरणात ज्या ब्रिटीश (किंवा तशाच इतर अनेक देशांतून आलेल्या) स्त्रियांनी घरे उभी केली आणि वारस पुरवले, त्यांची जणू काही ओळखच नाही.  
                   हेनरी निवृत्त होऊन जेंव्हा ती दोघे इंग्लंडला परत जातात , त्यावेळी अगदी उलट परिस्थिती होते. त्यांची दोन्ही मुले लग्न करून भारतात निक्रीसाठी मागे राहतात, हेनरीचा आणि मरियम (नोकराणी) चा मुलगा इथे राहतो आणि सगळ्या आठवणी फक्त आणि फक्त हिंदुस्तानाशीच निगडीत अशा मागे उरतात. ज्या तडफडीला अँन आणि हेनरी आयुष्यभर सामोरे गेले, आणि एके दिवशी इंग्लंडला परत जायच्या आशेवर त्यांनी इथले आयष्य काढले त्याच तडफडीला त्यांना आता कायमचे सामोरे जायचे आहे, कारण आता त्यांच्या प्रत्येक क्षणावर हिंदुस्तानी आठवणींचे सावट आहे.
                 काही वर्षांपूर्वी ते जेंव्हा  हिंदुस्तानात आले, त्यावेळी इंग्लंडमधील व इथल्या परिस्थितीत काहीच साम्य नव्हते आणि  आताही तीच परिस्थिती आहे, फक्त आता ते इंग्लंडमध्ये आहेत.
               
                 'विदेश' ची अनेक पारायणे केल्यावर माझ्या मनावर ठसा उमटला आहे तो कव्हरवर असणा-या मंद प्रकाशात एकाकी बसलेल्या  अँनचा. माझ्यासाठी ही कहाणी प्रामुख्याने अँनची आहे.

२०१२/०९/०६

मुग्ध शैशवातील कोवळ्या आठवणी

  





शांताबाईनी केलेल्या अनुवादाचे असे वर्णन केले गेले आहे.
लुईसा मे अलकॉट ह्या अमेरिकन लेखिकेच्या 'लिटिल वूमन' ह्या पुस्तकाचा शांताबाईनी केलेला 'चौघीजणी' हा अनुवाद शाळेत असताना वाचायला मिळाला. तेव्हा त्यातील अनेक गोष्टी समजल्या असं वाटलं, तरी मुळात समजलेल्या नव्हत्या. पण तरीही आवडीने ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचले गेले.
कॉलेजला एफ. वाय. ला असताना इंग्रजीच्या पेपर मध्ये ह्या मूळ इंग्रजी पुस्तकातला एक उतारा आकलनासाठी आला. परीक्षेनंतर वर्गात  शिक्षिकाबाईंनी विचारलेल्या   मूळ पुस्तक, लेखिका इत्यादी विषयक प्रश्नांना उत्तर देणारी मी एकटीच होते.  ती उत्तरे दिल्यावर सगळ्या वर्गाचा आणि खुद्द त्या शिक्षिकाबाईंचा असा समज झाला, की मी म्हणजे इंग्रजीचं अफाट वाचन करणारी, अगदी व्यासंगी वगैरे कोणी आहे. पण हा समज मनाला कुठेतरी आवडला सुद्धा. 'मूळ पुस्तक वाचलेलं नसेना का, पण निदान मला माहिती तरी आहे' असा अभिमान सुद्धा वाटला. त्यामुळे वाचायला आणि अभ्यासाला हुरूप आला.

मार्च कुटुंबातील चार बहिणींच्या बालपणात सुरु होणारी हे कथा दुस-या भागात त्यांच्या वैवाहिक जीवनात नेऊन पोहोचवते.
अगदी साधारण परिस्थिती असलेल्या, वडील युद्धावर गेले आहेत (अमेरिकन यादवी युद्ध) आणि आई सैनिकांसाठी पोहोचवण्यात येणारे अन्न भरून देण्याच्या कामावर जात आहे, अशा परिस्थितीत एकमेकींना सांभाळणा-या ह्या चौघीजणींचं एक वेगळंच जग आपल्यासमोर येतं. त्या चौघींचे अगदी वेगवेगळे असणारे स्वभाव, त्यांच्या कल्पना, त्यातून होणारे गोंधळ, उडणा-या गंमती-जंमती हे सगळं अगदी अलगद उलगडत जातं.

अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून त्या चौघींचं मन आपल्याला कळू लागतं आणि आपण त्याच्यात गुंतत जातो.
त्या चौघींची कहाणी वाचतांना मी इतकी गुंग झाले, की नकळत मी मला आणि माझ्या ताईला त्यांच्यात पाहू लागले. अनेक प्रसंग वाचतांना मला जाणवू  लागले की आम्ही दोघी बहिणी अश्याच आहोत. आम्ही असंच भांडतो, आम्ही अशीच मजा करतो. आम्ही अशाच एकमेकींना सांभाळतो.



अश्याच काही प्रसंगात त्यांचा छोटा मित्र टेडी आपल्याला भेटतो. श्रीमंत टेडी आणि त्याचे आजोबा (मार्च कुटुंबाचे शेजारी) हे पाहता पाहता त्या घराचा एक भाग बनून जातात.त्यांच्या मदतीने मेगची, सगळ्यात मोठ्या बहिणीची प्रेमकथा हळुवार सुरु होते आणि फुलते. बेथच्या रूपाने आजोबांना आपली नात मिळते. इतकेच काय तर टेडी चा नोकर मनोमन मार्च कुटुंबाच्या घरात असणा-या h^ना वर  प्रेम करू लागतो.

अशी ही गोष्ट वाचताना आपण केंव्हा त्या घराचा एक भाग होऊन जातो हे कळतच नाही. त्या चौघीजणी आपल्या मनात कायमचं स्थान मिळवतात.
नेगल

जागतिक वसुंधरा दिवस आणि आजच मला ह्या पुस्तकाविषयी लिहावेसे वाटावे हा एक चांगला योगायोगच म्हणायला हवा.
डॉ. प्रकाश आमटे यांचे नाव सर्वश्रुत आहेच.  त्यांचे सहकारी श्री. विलास मनोहर यांनी लिहिलेले 'नेगल' हे पुस्तक म्हणजे अनुभवांचा एक खजिनाच आहे.
हेमलकसा येथे आदिवासींसाठी काम करताना शिकार झालेल्या वन्य प्राण्यांची पिल्ले वाचवण्याचा एक उपक्रम सुरु झाला. आदिवासींचे बरेच समुपदेशन केल्यावर, ते त्यांनी शिकार केलेल्या वन्य प्राण्यांची पिल्ले हेमलकसा प्रकल्पावर आणून देऊ लागले, वन्य प्राण्यांना, लहान पिलांना वाचवण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले.
विलास मनोहर यांनी लिहिल्याप्रमाणे आधी ते स्वतः शिकारीसाठी जात असत. पण हेमलकसा प्रकल्पात सहभागी झाल्यावर त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला असं म्हटलं तर हरकत नाही.
आजपर्यंत ह्या प्रयत्नांमुळे अनेक प्राण्यांना जीवदान मिळाले आहे. रानमांजरापासून ते बिबट्या-सिंहापर्यंत आणि अनेक पक्ष्यांसोबत हा प्रवास सुरु आहे. माणसाच्या रक्ताला चटावणारा प्राणी अशी ओळख असणारा बिबट्या डॉक्टरांच्या मुलीसाठी खेळातला घोडा सुद्धा व्हायला तयार झाला. लेखकाच्या म्हणण्यानुसार हा चमत्कार नाही, तर ही प्रेमाची शक्ती आहे.
काही काळापूर्वी शिकारीसाठी जाण्याऱ्या विलास मनोहरांकडून आलेली ही प्रतिक्रिया हृद्य वाटते.
तरीही ते प्रांजळपणे सांगतात, की  'आज इतक्या वर्षांनंतरही प्रकाश ज्या विश्वासाने प्राण्यांना हाताळू शकतो, त्याला तोड नाही व मी कुठेतरी कमी पडतो. माझापेक्षा त्याच्यावर प्राण्यांचे प्रेम काकणभर अधिक आहे'. विशेषतः ही गोष्ट बिबट्याच्या संदभार्त त्यांनी लिहिली आहे.
प्रकल्पावर आलेल्या वेगवगळ्या प्राण्यांच्या सवयी, त्यांचे हट्ट, त्यांच्या लाड करून घ्यायच्या पद्धती, त्यांच्या आवडत्या व्यक्ती अशा विविध अनुभवांचा खजिना आपल्यासमोर त्यांनी मांडला आहे. आईने आपल्या बाळाचे कौतुक सांगावे, त्या ममतेने त्यांनी आपल्या या बाळांचे कौतुक सांगितले आहे.   (अर्थात प्राण्यांना सुद्धा आपल्यावर प्रेम करावेसे वाटावे, ह्यासाठी त्यांना आईचेच अतुलनीय प्रेम दिले पाहिजे - जे डॉ. प्रकाश आणि त्यांचे सर्व सहकारी देत आहेत.)
काही ठिकाणी सुविधांच्या अभावाचा, सरकारी असहकाराचा, अनास्थेचा उल्लेख केला आहे. जागेच्या, सुविधांच्या, आर्थिक मदतीच्या अभावामुळे अनेक प्राणी, जे अगदी लहान असताना प्रकल्पावर आले होते, त्यांना दुःखी मानाने परत जंगलात सोडून द्यावे लागले. पण मोकळ्या जंगलात वावरणे, स्वतःचे अन्न स्वतः मिळवणे हाच त्यांचा निसर्गधर्म असल्याने सगळ्यांनी मनावर दगड ठेवला. मात्र अशा जंगलात परत गेलेल्या, टोळीत समाविष्ट झालेल्या एका माकडाने नंतर अनेक दिवसांनी त्या भागात परत आल्यावर ओळखल्याची लक्षणे दाखवल्याचे त्यांनी आवर्जून लिहिले आहे.
आपल्या प्रेमाची पावती माणसांपेक्षा प्राणीच जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात असा आशय त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो. 'केलेले उपकार विसरायला तो माणूस थोडाच होता?' अश्या आशयाचे एक वाक्य त्यांनी वापरले आहे. एक अनुभव सांगताना ते म्हणतात, 'रानटी प्राणी असे हिणवणाऱ्या बायका अस्वल (राणी नावाचे प्रकल्पावरील अस्वल) दिसताच पळून जाऊ लागल्या आणि मुलांना उचलून घ्यायचे ही भान राहिले नाही.'  (मग बिरबलाच्या गोष्टीतील माकडिणीला नावे का बरं ठेवायची?)
आतापर्यंत आलेल्या अनुभवांचे कथन करताना, काही प्राण्यांच्या मृत्यूने झालेले दुःख, ह्या परिवारात नव्याने आलेल्यांचे कौतुक हेही आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. पण त्याच बरोबर अनिश्चित अशा  भविष्याविषयी चिंताही व्यक्त केली आहे.
वसुंधरा दिनारोजी आज हे माझे हेमलकसा प्रकल्पाला छोटेसे योगदान. पुढे असेच कार्य हातून घडो हे देवाकडे प्रार्थना आणि डॉ. प्रकाश , विलास मनोहर ह्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा!!!